पुण्यात आंबेडकर जयंती डीजे आणि लेझर लाईटशिवाय होण्याची चिन्हे कारण..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक कौतुकास्पद असा निर्णय घेण्यात आलेला असून आंबेडकरी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी जयंती डीजे आणि लेझर अशा गोष्टी टाळून करण्याचे आवाहन पुण्यातील कॅटलिस्ट फाउंडेशनने केलेले आहे. पुणे जिल्ह्यात गणेशउत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात डीजे आणि लेझर लाईटचा वापर केल्याने एका तरुणाची दृष्टी कमी झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

वरिष्ठ पत्रकार आणि कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी याप्रकरणी बोलताना पुणे शहरातील विविध मंडळे आणि बौद्ध विहारांना भेट देऊन आंबेडकर जयंतीमध्ये डीजेचा वापर करू नये असे आवाहन करत त्यांचे मते परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे , असे म्हटलेले आहे.

सुनील माने पुढे म्हणाले की , ‘ आंबेडकरी जनतेचे अद्यापपर्यंत देखील शिक्षण नोकरी असे प्रश्न सुटलेले नाहीत अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लोकांना त्रास होईल असे वर्तन करण्यापेक्षा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाबासाहेब ज्ञानसूर्य होते म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याशी संबंधित असलेल्या मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर बंद करावा यासाठी आपण सक्रियतेने आपण आवाहन करत आहोत , ‘ असे त्यांनी म्हटलेले आहे.

पुणे जिल्ह्यात गणपती विसर्जनानिमित्त मोठ्या प्रमाणात डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. पुणे शहरात सद्य परिस्थितीत अनेक हॉस्पिटल , शैक्षणिक संस्था खाजगी क्लासेस सुरू झालेले असून अभ्यास उपचार यासाठी अनेकजण शहरात दाखल होतात मात्र तरुणांच्या उत्साहापुढे त्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पुण्यातील आंबेडकर जयंती यंदा डीजे आणि लेझरच्या लाईट शिवाय पार पडेल का ? हे येत्या काळात दिसून येईलच मात्र सुनील माने यांच्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.


Spread the love