शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये फसवणुकीचा एक अजब आणि अद्भुत असा प्रकार समोर आलेला असून विशिष्ठ धातूच्या मूर्ती विक्रीतून एक कोटी रुपये मिळून देतो असे सांगत शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल 24 लाख रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रघुवीर संधू ( वय 53 राहणार खराडी ) असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव असून नेताजी नाईकवाडी ( वय 55 राहणार मगरपट्टा सिटी हडपसर ) यांनी या संदर्भात फिर्याद दिलेली आहे. सदर घटना 2020 पासून आता 5 ऑक्टोबरपर्यंत घडलेली असून आरोपीने वेळोवेळी त्यांच्या तक्रारदार यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत.
फिर्यादी व्यक्ती असलेले नाईकवाडी यांचा सिमेंट विक्रीचा व्यवसाय असून साधू वासवानी चौकात यांचे ऑफिस आहे. एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून आरोपी असलेला संधू याच्यासोबत त्यांची ओळख झालेली होती . रघुवीर याने तक्रारदार यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि आपल्याकडे एक मौल्यवान धातूची मूर्ती आहे . एका एजन्सीच्या माध्यमातून जर आपण तिची विक्री केली तर आपल्याला तीन कोटी रुपये मिळतील , असे सांगितले होते.
सद्य परिस्थितीत एजन्सीच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत ती मदत जर तुम्ही केली तर तुम्हाला एक कोटी रुपये मिळतील , असे त्याने सांगितलेले होते . तक्रारदार व्यक्ती यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला वेळोवेळी टप्प्याटप्प्याने 24 लाख रुपये दिले मात्र तरी देखील ही मूर्ती विकली गेली नाही आणि अद्यापपर्यंत एक छदामही मिळाला नाही म्हणून त्यांनी पोलिसात दाखल होत गुन्हा नोंदवलेला आहे.