महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून वडाळा परिसरात जळालेल्या अवस्थेत एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. केसांना लावलेल्या मेहंदीने अखेर महिलेची ओळख पटलेली असून चोरी करण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या करून मृतदेह जाळण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून चहा पिण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला घरात बोलावले आणि त्यानंतर तिची हत्या केली.
उपलब्ध माहितीनुसार , सुग्राबी हुसेन मुल्ला ( वय 71 ) असे मयत महिलेचे नाव असून त्यांचा मृतदेह 26 ऑक्टोबर रोजी बीपीटी प्रवेशद्वार क्रमांक चार पाचच्या दरम्यान अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका गोणीत आढळून आलेला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा देखील होत्या. मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आल्यानंतर वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी 12 पथके नेमण्यात आलेली होती.
सदर महिलेच्या अंगावरील दागिने आणि छायाचित्र दाखवून शोध घेण्यात आला त्यावेळी सोसायटीमधील शहीद भगतसिंग रोड येथील चिंधी गल्ली परिसरात काम करणारी एका महिलेच्या घरी काम करणारी सुग्राबी ही तीन-चार दिवसांपासून कामावर आलेली नसल्याची माहिती मिळाली होती . मृतदेहाच्या डोक्यावरील केसांच्या रंगावरून महिलेला मेंदी लावण्याची सवय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली.
सदर प्रकरणी मोहम्मद फैज रफिक सय्यद उर्फ बाबा ( वय सत्तावीस) याला ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्याने महिलेच्या अंगावरील दागिने पाहिल्यानंतर स्वतःची नियत बदलली आणि चोरीच्या उद्देशाने आपण तिच्या डोक्यात लोखंडी सळई मारली. गोड बोलून तिला चहासाठी बोलावले आणि त्यानंतर तिचा खून केला याची कबुली दिलेली असून पुरावा पाठीमागे राहू नये म्हणून तिला जाळण्याचा प्रयत्न केला असे म्हटलेले आहे.