राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. महिन्यभरात आता परिस्थिती बदलली आहे. इतरांना पकडणारे आता स्वत: बचावासाठी प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला असल्याने वानखेडे यांचे आणखी खुलासे बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
नवाब मलिक काय म्हणाले ?
2 ऑक्टोबरनंतर परिस्थिती बदलली आहे. जो व्यक्ती आर्यनला तुरुंगात घेऊन जात होता. तो आता तुरुंगात आहे. जो व्यक्ती आर्यनला जामीन मिळू नये म्हणून शक्तीपणाला लावत होता. तो काल कोर्टात दाद मागत होता. पोलिसांनी जी चौकशी सुरू केली आहे, ती सीबीआय किंवा एनसीबीकडे द्या म्हणत होता. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. संपूर्ण सिक्वेन्स बदलला आहे. धरपकड करणारे आता बचावाचा मार्ग शोधत आहे. म्हणून मी काल म्हटलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत निरापराध व्यक्तीला तुरुंगात डांबणं चुकीचं आहे. काल तीन लोकांना जामीन मिळाला. वानखेडे आल्यानंतर एनसीबीने अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं. एक महिन्याच्या आत आता अनेक गोष्टी बदलत आहेत. वानखेडेंनी सर्व हातखंडे वापरले. आधी म्हणाले की माझ्या कुटुंबला या प्रकरणात घुसडण्यात येत आहे. माझ्या मरहूम आईचंही या प्रकरणात नाव घेतलं. पण मी कधीच त्यांच्या आईचं नाव घेतलं नाही. मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा ट्विटरवर फोटो टाकला. पण त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल एका शब्दानेही बोललो नाही. माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही. लढाई ही अन्यायाविरोधात आहे.
मी एका दाढीवाल्याचं नाव घेतलं होतं. या दाढीवाल्याचं नाव काशिफ खान असं आहे. तो त्या पार्टीत होता. तो फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. तो सेक्स रॅकेट चालवतो. तो समीर वानखेडेंचा मित्रं आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही ?