उत्तर प्रदेशात भाजप उमेदवारांचे ‘ असे ‘ केले जातेय स्वागत

Spread the love

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे राज्यात चित्र आहे. 10 आणि 14 फेब्रुवारी रोजी पश्चिम यूपीमध्ये हे मतदान होणार आहे मात्र राज्यातील या भागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.काही जणांवर चिखलफेक आणि दगडफेक झाल्यानंतर उमेदवारांवर चक्क पळ काढण्याची वेळ येत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.

शिवलखास विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मनिंदरपाल सिंग यांच्यावर 24 जानेवारी रोजी चुर गावात हल्ला झाला मात्र या प्रकरणात सिंग यांनी तक्रार दाखल केली नाही, परंतु पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि गुरुवारी 20 नावांसह आणि इतर 65 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला.

मनिंदरपाल सिंह म्हणाले, “माझ्या ताफ्यातील 7 वाहनांवर दगडफेक करण्यात आली, तरीही मी या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाही. हे आमचेच लोक आहेत, मी त्यांना माफ केले. लोकशाहीत मते मागणाऱ्यांबाबत अशा घटना घडू नयेत.”

मुझफ्फरनगरमधील खतौली येथील भाजप आमदार आणि विद्यमान उमेदवार विक्रम सैनी यांना भैंसी गावात शेतकऱ्यांच्या जमावाने घेराव घातला आणि भाजपविरोधी घोषणा दिल्या. यावेळी अनेक आंदोलक ‘तुम्ही 5 वर्षांनी इथे आलात’ अशा घोषणा देत होते. विक्रम सैनी यांनी दिल्लीजवळील सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केली होती. सैनी यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील मुन्नावर कलान गावात अशाच आंदोलनाला सामोरे जावे लागले होते.

बागपतमधील छपरौली येथील भाजपचे उमेदवार सहेंद्र रमला यांना शुक्रवारी दाहा गावात काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना प्रचारासाठी निरुपडा गावात येऊ दिले नाही. बिजनौरच्या ताहारपूर गावातील भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, लोकांचा हा संताप रास्त आहे. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत राहिल्यास त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.


Spread the love