केतकी चितळेच्या तोंडाला फासलं काळं अन फेकली अंडी, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचा दणका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणे केतकी चितळेला चांगलेच भारी पडले आहे. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली. पोलीस तिला घेऊन जात असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्या तोंडाला काळं फासलं तसेच तिच्या अंगावर अंडी देखील फेकली. धक्कादायक म्हणजे यावेळी ती हसत होती

शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याने तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे हिला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तिला एका रुममध्ये बसून ठेवण्यात आले होते. त्यानंतर केतकीला कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

केतकीला आता ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. अटकेची प्रक्रिया कळंबोली पोलीस स्टेशनला केली जात आहे. रात्री ठाण्यात आणलं जाईल आणि सकाळी ठाणे कोर्टात हजर केले जाणार आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.

अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती यात संत तुकाराम यांचाही तिने अपमान केलेला आहे.