एकीकडे देशात महागाईचा आगडोंब उसळलेला असताना अनेक नागरिकांच्या पुढे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालेली आहे मात्र असे असताना गहू पीठ, मैदा, डाळी, तांदूळ आणि दही यासारख्या नॉन ब्रँडेड खाद्यपदार्थावर देखील पाच टक्के जीएसटीच्या विरोधात संपूर्ण देशभरात व्यापारी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 16 जुलै रोजी किरकोळ व्यापारी व्यापार बंद आंदोलन करून सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करणार आहेत.
जीएसटी परिषदेने प्री पॅक केलेल्या लेबल लावलेल्या खाद्यपदार्थांवर पाच टक्के दराने जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. आधीच महागाईत होरपळत असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार असून त्यामुळे विक्रीवर देखील अनेक बंधने येणार आहेत म्हणून व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
18 जुलैपासून सरकार देशभरात वेगवेगळे पॅक केलेले पीठ, डाळी, तांदूळ, अन्नधान्य, दही, लस्सी व इतर खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू करणार आहे त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांना फटका बसणार असला तरी सरकारच्या तिजोरीत मात्र बक्कळ पैसा जमा होणार आहे. जीएसटी लागू करताना सुरुवातीला सरकारने अन्नधान्य, पीठ आणि डाळी या वस्तू जीएसटीच्या बाहेर राहतील असे म्हटले होते मात्र पुन्हा एकदा घुमजाव करत दिलेले आश्वासन पाळण्यात न आल्याने व्यापाऱ्यांकडून विरोध व्यक्त केला जात आहे.