नगर जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आलेली असून संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात गोरे वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमूरड्याचा मृत्यू झालेला आहे . गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , हर्षल राहुल गोरे ( वय चार वर्ष ) असे या घटनेत मृत्युमुखी झालेल्या बालकाचे नाव असून गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तो आपल्या घरी जात असताना मकाच्या पिकात भक्ष्याच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षल याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढत मकाच्या पिकात घेऊन गेला.
त्याच्यासोबत असलेला त्याचा बालमित्र साई गोरे याने आरडाओरडा केला त्यावेळी लोकांनी मक्याच्या पिकात धाव घेत बिबट्याच्या तावडीतून हर्षल याची सुटका केली आणि त्याला तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र हर्षल याचा मृत्यू झालेला होता.
पोलीस पाटील सुनील मगर यांनी वनविभाग आणि आश्वी पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली . नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी अनेकदा केलेली आहे. उंच पिकांमध्ये बिबट्या भक्ष्याच्या शोधात बसतात आणि अल्पवयीन मुले अन महिला यांच्यावर हल्ला करून सर्वप्रथम मानेचा चावा घेतात. मानेभोवती काही गुंडाळलेले असेल तर बिबट्याला शिकार साधने अवघड वाटते त्यामुळे शेतकरी बांधवांनी मानेभोवती काहीतरी गुंडाळून काळजी घेणे गरजेचे आहे.