देवेंद्र फडणवीस ज्यांच्या घरी गेले, त्या मायकल लोबोंनी भाजप सोडली! सपत्नीक काँग्रेसमध्ये

Spread the love

कळंगुट : कळंगुट हा गोव्यातील महत्त्वाच मतदारसंघ. गेल्या अनेक दिवसांपासून कळंगुट मतदारसंघाचील राजकारण रंगात आलेलं आहे. अशातच सोमवारी मायकल लोबो यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली असून अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी डिलायला लोबो यादेखील काँग्रेस पक्षात आल्या आहेत.

भाजपला सातत्यानं घरचा आहेर देण्याच्या नेत्यांपैकी मायकल लोबो एक होते. त्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा भाजपला घरचा आहेर देत भाजपच्या मंत्रिमंडळातील नेत्यांशी पंगा घेतला होता. भाजप सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभूपाऊसकर तसंच मॉविन गुदिन्हो यांच्यासोबत मायकल लोबो यांचे खटके उडाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अशातच आता ऐक निवडणुकीचा कार्यक्रम जवळ आलेला असताना त्यांनी भाजपला राम-राम केलाय.

सपत्नीक मायकल लोबो हे काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनीही त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघ गोव्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून उत्तर गोव्यातील या मतदारसंघात मायकल लोबो यांनी नेहमीच आपलं वर्चस्व राखलं आहे. त्यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे आता गोव्यातील राजकारण अधिकच रंगतदार स्थितीत आलं आहे.

आता कळंगुटमधून भाजप कुणाला उमेदवारी देतं, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जगप्रसिद्ध असलेल्या टिटोजचे सर्वेसर्वा रिकार्डो डिसूझा यांनीही फडणवीसांची भेट गोवा दौऱ्यादरम्यान घेतली होती. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयातही त्यांनी हजेरी लावत महत्त्वाची चर्चा दिल्लीतील भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत केली होती. आगामी काळात आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत, असं रिकार्डो यांनी म्हटलं होतं. मात्र अपक्ष लढणार की कुण्या पक्षाच्या तिकिटावर लक्षणार, हे रिकार्डो यांनी स्पष्ट केलं नव्हतं. अशातच आता मायकल लोबोंनी भाजप सोडल्यामुळे कळंगुटमधून रिकार्डो यांनी उमेदवारी भाजप देते का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.


Spread the love