देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून गुजरातमधील वलसाड शहरामध्ये एका नवविवाहित जोडप्याला त्याची सुहागरात जेलमध्येच घालवण्याची पाळी आली होती. सदर नवदाम्पत्य कोरोना प्रतिबंधक नाईट कर्फ्यूदरम्यान लग्न करून येत होते आणि त्यांच्यासोबत कुटुंबातील इतर लोकही होते मात्र वाटेत त्यांना पोलिसांनी अडवले आणि कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन न केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर विवाह सोहळा वलसाड शहराबाहेरील एका फार्महाऊसमध्ये झाला होता. लग्नसोहळा आटोपून वधू-वर हे कुटुंबासोबत घरी येत होते. त्याचवेळी पोलिसांनी यांची गाडी अडवली आणि कोरोना गाईडलाईन्सचे पालन न केल्याप्रकरणी वधू-वरांसह अन्य वऱ्हाड्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र वऱ्हाड्यांना पोलीस स्टेशनवरून जामिनावर मुक्त करण्यात आले. पोलिसांनी म्हटले आहे की, जेव्हा या वऱ्हाड्यांना अडवण्यात आले त्यावेळी वर पोलिसांसोबत हुज्जत घालू लागला म्हणून कारवाईचा बडगा उगारावा लागला.
वराने सांगितले की, काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना येण्यास उशीर झाला होता. कुटुंबीयांनी पोलिसांना विनंतीही केली की वऱ्हाड्यांना थांबवा, पण वधू-वरांना जाऊ द्या मात्र पोलिसांनी ही विनंती धुडकावून लावली आणि आमच्यासोबत गैरवर्तन केले आणि पोलीस ठाण्यात नेले.