जगामध्ये रोज अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात मात्र अशीच एक वेगळी बातमी अमेरिकेतून आलेली असून सोने आणि अमली पदार्थाची तस्करी केल्याचे अनेक प्रकार आत्तापर्यंत उघडकीला आलेले आहेत मात्र या घटनेत चक्क सापांची तस्करी करत या व्यक्तीने कपड्यांच्या आतमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी साप लपवले होते.
मेक्सिकोची सीमा ओलांडत अमेरिकेत प्रवेश केलेल्या या व्यक्तीने आपल्या कपड्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ असे बावन्न जिवंत साप व सरडे लपवून आणले होते. त्याचा हा तस्करीचा वेगळाच प्रकार पाहून अमेरिकेचे कस्टम अधिकारी देखील चक्रावून गेले मात्र त्यांनी तात्काळ कारवाई करून संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.
मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत वेगवेगळ्या पदार्थांची तस्करी केली जाते त्यात अमली पदार्थांचा देखील समावेश असून वन्य प्राण्यांची कातडी देखील अमेरिकेत चोरीच्या मार्गाने आणली जाते त्यामुळे कस्टम विभागाची सदर प्रकारांवर करडी नजर असते.
मेक्सिकोतील ट्रक घेऊन अमेरिकेत आलेल्या या चालकाची कस्टम अधिकाऱ्यांनी झडती घेतली त्यावेळी त्याच्या जॅकेट आणि पॅन्टच्या खिशामध्ये 52 छोट्या आकारांच्या पिशव्यांमध्ये 43 जिवंत सरडे आणि नऊ साप आढळून आले. पिशव्यांमध्ये अनेक काळ राहिल्याने ते अर्धमेले झालेले होते. त्यांच्यावर प्राणी तज्ञांकडून उपचार करण्यात आले असून या चालकाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.