लग्न जमेना म्हणून टॉवरवर चढून बसला पण उतरताच येईना मग ..

Spread the love

आंदोलन करण्यासाठी आज काल कोण काय करेल याचा नेम राहिलेला नाही अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे उघडकीला आली असून आळंदी शहरालगत केळगाव हद्दीत एक व्यक्ती उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टावरवर चढला होता. तब्बल 12 तासांपेक्षा अधिक तो टॉवरवर बसून होता. सुदैवाने त्याला विजेचा धक्का बसला नाही मात्र त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस महावितरण कंपनी आणि स्थानिक नागरिक यांच्या नाकीनऊ आले. अखेर रविवारी वीस तारखेला सकाळी आठच्या सुमारास तो जाळीवर उडी मारून उतरला.

उपलब्ध माहितीनुसार, किशोर दगडोबा पैठणे ( सध्या राहणार वाघोली मूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा ) असे त्याचे नाव असून तो केळगाव हद्दीतील उच्च दाब विद्युत वाहिनीवरच्या टोकावर जाऊन बसला होता. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्याला खाली उतरण्याची विनंती केली मात्र तो खाली येत नसल्याने विद्युत महामंडळाचे कर्मचारी देखील तिथे दाखल झाले आणि त्याला विनवणी करू लागले. त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी देखील रात्र जागून काढली.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीचे पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे लिडिंग फायर अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले मात्र वर लढायला जमले पण त्याला उतरता येत नव्हते म्हणून खाली जाळी पकडून धरण्यात आली आणि त्यावर त्याला उडी मारण्यास सांगण्यात आले त्यानंतर त्याने उडी मारली आणि त्याची सुखरुप सुटका करण्यात आली. त्याची आई यांना बुलढाणा येथून बोलवण्यात आले आणि नंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आले. सदर युवकाने लग्न जमत नसल्याने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.


Spread the love