माणूस आणि कुत्रा यांचे नाते गेल्या कित्येक पिढ्यांपासून खुप जवळचे राहिलेले आहे. प्राण्यांमध्ये सर्वात जवळ जर कोणता प्राणी माणसाच्या जवळ असेल तर तो म्हणजे कुत्रा. वफादारी निभावण्यात देखील श्वान कित्येकदा मालकांसाठी जिवाची बाजी लावतात मात्र माणूस देखील अनेकदा आपल्या मित्रासाठी असा प्रयत्न करतो. अशीच एक घटना समोर आली असून चक्क ५० फूट विहिरीत पडलेल्या कुत्रीला वाचवण्यासाठी दोन श्वानप्रेमी विहिरीत उतरले आणि त्यांनी या कुत्रीचा जीव वाचवला.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे इथे एका कुत्रीमागे इतर कुत्रे धावल्याने अनावधानाने ती थेट विहिरीत पडली. रात्री दहाची वेळ असल्याने तिला वाचविणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला. नेमके याच वेळी तिची पिल्ले विहिरीच्या काठाशी येऊन आईकडे पाहत होती . हे दृश्य पाहून परिसरातील दोन युवक समोर आले आणि त्यांनी जिवाची बाजी लावत दोरखंडाच्या साह्याने ५० फूट विहिरीत उतरून पाच पिल्लाच्या आईला वाचविले.
बबलू द्विवेदी (३२) व शैलेश नाईक (३०) रा. हिरापूर धामनगाव अशी या युवकाची नावे असून त्यांच्या या कामामुळे त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे. कडाक्याच्या थंडीमुळे या पडक्या विहिरीत उतरण्यास कुणीही धजावत नव्हते अशात सर्पमित्र बबलू द्विवेदी व शैलेश नाईक तिथे आले आणि त्यांनी राजेश चौबे यांच्याकडून ५० फुटांचे दोरखंड कंबरेला बांधून विहिरीत उतरण्याचा धोका पत्करला आणि या कुत्रीला बाहेर काढले. बाहेर येताच कुत्री आपल्या पिलाजवळ गेली आणि त्यांना चाटू लागली . हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांचे देखील डोळे पाणावले.