नगर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्यानंतर हिरवळ उगवलेली असल्याने अनेक प्राणी चाऱ्यासाठी बाहेर पडतात मात्र त्यातून त्यांची शिकार करण्यासाठी पाथर्डी परिसरात बिबट्याचे देखील आगमन झालेले आहे. वनविभागाने या आधी देखील परिसरात येऊन पाहणी केली आहे मात्र अद्यापही हा बिबट्या वनविभागाच्या हाती लागलेला नाही. पाथर्डी तालुक्यातील केळवंडी येथे बिबट्याने दोन शेळ्यांची शिकार केलेली असून अशोक निवृत्ती शेटे असे या शेळी मालकाचे नाव आहे. घटनास्थळी दाखल होऊन वनविभागाने पंचनामा केला असून त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सोमवारी रात्री ही घटना घडली असून गोठ्यामध्ये ओरडल्याचा आवाज आला त्यानंतर अशोक शेटे यांनी गोठ्यात धाव घेतली असता शेळीच्या मानेवर जखमा झालेल्या होत्या तर दुसरी शेळी जखमी होऊन घायाळ झालेली होती. तात्काळ तिथे लोक येताच बिबट्या तिथून पळून गेला आणि त्यानंतर सकाळी वनविभागाचे कर्मचारी आले तेव्हा त्यांनी बिबट्याच्या पायाचे ठसे पाहिले त्यावरून हा हल्ला बिबट्याने केलेला आहे हे स्पष्ट झाले.
दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याने अशोक शेटे यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यामुळे त्यांना वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे. याच केळवंडी गावात दोन वर्षांपूर्वी एका लहान मुलाचा देखील बळी घेतला होता त्यानंतर पुन्हा एकदा बिबट्या सक्रिय झालेला असून नागरिकांच्या जीविताला देखील त्यामुळे धोका उत्पन्न झाला आहे.
वनविभागाने ‘ नागरिकांनी सावध राहावे आणि रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये तसेच घराच्या बाहेर झोपणे टाळावे ‘ असे आवाहन केले आहे तसेच शेतामध्ये काम करताना खाली वाकून काम करू नये. बिबट्याबद्दल काही माहिती समजली तर ती वनविभागाला कळवावी, असे म्हटले आहे.