‘ तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘, कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम

Spread the love

काहीतरी हटके करायचं अशी कोल्हापूरकरांची नेहमीपासूनची स्टाईल आहे असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून गुरुवारी खासबाग येथील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील प्रिन्स क्लब नावाच्या एका सामाजिक संघटनेने एका नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टॅंकरवरून वरात काढली होती. सदर प्रकाराची कोल्हापूर येथे जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते असलेले विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंके यांचा गुरुवारी विवाह सोहळा झाला होता त्यानिमित्त काढण्यात आलेल्या वरातीमध्ये पाण्याच्या टॅंकरवर वधू-वराला बसवण्यात आले होते आणि त्यांच्या समोर रिकाम्या घागरी ठेवलेल्या होत्या. ‘ बायकोला पाण्याचा त्रास नको म्हणून हुंडा म्हणून पाण्याचा टँकर घेतला ‘ असे यावर लिहिलेले होते तसेच ‘ पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘ असा मजकूर घेऊन लिहिलेले फलक या गाडीवर लावण्यात आले होते तसेच गाडीच्या समोर महिला आणि मुले डोक्यावर रिकाम्या घागरी आणि हंडे घेऊन नाचत होत्या.

‘ जोपर्यंत खासबाग परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘ असाही उल्लेख टँकरवर असल्याने या प्रकाराची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. नवरदेवाच्या घरी पोहोचल्यानंतर नवदांपत्यांने टँकरचा पाईप हातात घेऊन घरात पाणी सोडले. नवरीच्या रुपात लक्ष्मी आली त्यामुळे आता पाण्यासाठी भटकावे लागणार नाही असा यामागे संदेश होता. सचिन साबळे, अमित रमेश मोरे, अभिजित पवार, संजय पिसाळ यांनी यासाठी परिश्रम घेतले.


Spread the love