नगर जिल्ह्यात डोंगराळ भाग असलेल्या पाथर्डी आणि पारनेर तालुक्यात बिबट्याचे अस्तित्व आढळून आलेले असून त्या पाठोपाठ आता रानडुकरांचा देखील उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परिसरातील रानडुकरे हे चक्क माणसांवर देखील हल्ले करत असून त्यांच्या हल्ल्यात नगर तालुक्यातील जेऊर येथील एक शेतकरी गंभीर जखमी झालेला आहे.
जेऊर परिसरातील बेलेकर वस्ती येथे राहणारे मनोज अजमुद्दिन इनामदार रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेले आहेत. 14 जुलै रोजी ही घटना घडलेली असून रात्री दहाच्या सुमारास आंब्याच्या बागेमध्ये कुत्रे भुंकत असल्याने मनोज इनामदार तिथे गेले त्यावेळी त्यांच्यावर रानडुकरांनी हल्ला केला. झुंडीने आलेल्या डुकरांना कुत्र्यांनी देखील जोरदार प्रतिकार केला आणि त्यांना पिटाळून लावले.
मनोज इनामदार यांच्याकडे तीन पाळीव कुत्रे असून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे पाहताच ही कुत्री अक्षरश: रानडुकरांवर तुटून पडली आणि इनामदार यांचा जीव वाचला. कुत्र्यांमुळेच आपला जीव वाचला असे देखील इनामदार यांनी म्हटलेले आहे. नगर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून कळपाने येणारे येणारी ही रानडुकरे संपूर्ण पिकच उध्वस्त करून टाकतात. खाण्यापेक्षा पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर करत असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे.
वनविभागाच्या म्हणण्याप्रमाणे रानडुकरापासून आपल्या पिकाचे आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बांधावर लोखंडी पाइपला पोते गुंडाळून तारेने पक्के बांधावे आणि त्यानंतर त्यावर डिझेल आणि मिरची पावडर टाकून धूर करावा किंवा सलून दुकानातील केस बांधावर जाळल्याने देखील रानडुकरे येत नाही याचादेखील प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झालेला आहे तोदेखील करायला काही हरकत नाही असे सांगण्यात आले आहे.