महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून बीड येथे आषाढी एकादशीला एका दुकानातून विकत घेतलेली भगर खाल्ल्याने पोलीस अंमलदारांना पोटदुखी सुरु झाली त्यानंतर त्यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आणि त्यांच्या या तक्रारीवरून पोलिसांनी दुकानदारामागे चौकशीचा ससेमिरा सुरू केलेला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाला सोबत घेऊन ही चौकशी करणे गरजेचे असते मात्र पोलिसांनी या प्रक्रियेला फाटा दिल्याची चर्चा आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर पोलिस अधिकारी हे वडवणी ठाण्यात कार्यरत असून शहरातील नगर रोडवरील किरण बोरा यांच्या दुकानातून त्यांनी आषाढी एकादशीला भगर खायला घेतली होती मात्र भगर खाल्ल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाल्याने त्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले आणि त्याचा ठपका दुकानदारावर ठेवत याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली.
पोलिसांनी दुकानदाराला ठाण्यात बोलावून चौकशी केली आणि त्यांचा जबाब घेतला त्यानंतर अन्न निरीक्षक यांच्या मदतीने भगरीचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून दिले. किरण बोरा यांनी आपण ज्या कंपनीकडून ही भगर घेतलेली आहे आहे त्याची सर्व माहिती पोलिसांना आधीच दिलेली आहे मात्र त्यानंतरही वेळोवेळी चौकशीचा ससेमिरा पाठीमागे सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली आहे तसेच आपल्या दुकानातून इतरही अनेक जणांनी त्याच दिवशी भगर खरेदी केली होती मात्र इतर कोणालाही त्रास झालेला नाही असेही सांगितले आहे.
बीडचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी इम्रान हाश्मी यांनी या प्रकरणावर बोलताना, ‘ अंमलदारांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार केली असेल तर माहिती नाही त्याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडे अशी तक्रार आलेली नाही. ठाण्यातूनही अशी माहिती आम्हाला सांगण्यात आलेली नाही मात्र आली तर कारवाई करु ‘ असे म्हटलेले आहे त्यामुळे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यातील कम्युनिकेशन गॅप पुन्हा एकदा समोर आलेला आहे.