बीडपाठोपाठ नांदेड जिल्ह्यात देखील आता मोकाट वानरांचा उच्छाद सुरू झालेला असून या एका वानराने चक्क एका महिलेला विहिरीत पाणी भरत असताना पाठीमागून येऊन ढकलून दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगाव येथे हा प्रकार समोर आला असून सुदैवाने या महिलेचा जीव अगदी थोडक्यात वाचलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेली असताना पाठीमागून हे माकड आले आणि त्याने या महिलेला धक्का दिला त्यानंतर ही महिला पाण्यात पडली. तिचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तिथे धाव घेतली आणि तिला बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले. सदर प्रकारासाठी वनविभागाकडून होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे असा आरोप करण्यात येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत या वानरांनी अनेक व्यक्तींना जखमी केलेले आहे. वारंवार तक्रार करून देखील वनविभागाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. पदवी पंडित ताबारे असे विहिरीत पडलेल्या महिलेचे नाव असून केवळ नागरिक तिथे उपस्थित होते म्हणून तिचा जीव वाचला अशी देखील प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिलेली आहे. लवकरात लवकर वनविभागाने या वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा वनविभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा देखील इशारा या महिलेच्या नातेवाईकांनी दिलेला आहे .