घोड्याने महिलेलं उडवले , खाली पडताच पुन्हा आला अन ..

महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असलेले शहर म्हणून अलिबागची ओळख आहे. पर्यटकांना घोड्यावर फिरवून अनेक जण आपल्या कुटुंबीयांची उपजीविका करतात मात्र परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असून अशाच एका घटनेत एक महिला जबरदस्त जखमी झालेली आहे. मोकाट सोडलेल्या एका घोड्याने महिलेला उडवले आणि त्यानंतर या महिलेला रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, स्वाती पाटोळे ( वय 48 ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जखमा झालेल्या आहेत. किरकोळ स्वरूपातील उपचार केल्यानंतर त्यांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली आहे मात्र शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. अलिबाग येथील रेवस बायपास येथे स्वाती कार्यालयात जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होत्या त्यावेळी घोड्यांची एक फौज तिथे आली आणि काही कळण्याच्या आत एका घोड्याने त्यांना उडवून दिले त्यानंतर घोड्याने पुन्हा येऊन त्यांना रस्त्यावर आपटले. अचानकपणे हा प्रकार घडल्याने स्वाती जागेवरच बेशुद्ध होऊन पडल्या.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जखमा झालेल्या असून कमरेला देखील मार बसलेला आहे डोक्यात जखम झाल्याने काही टाके घालण्यात आले असून झालेल्या घटनेविषयी नागरिकांमध्ये संताप आहे. अलिबाग शहरात सध्या घोडे, कुत्री, गुरे यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असून महापालिका प्रशासनाकडून त्याच्याविरोधात पावले उचलत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.