महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लग्नासाठी वय उलटून चालली तरी तरुणांना मुली मिळत नाहीत त्यामुळे सोलापूर येथे चक्क लग्नाळू तरुणांनी घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. सोबतच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करा अशी देखील मागणी या लग्नाळू तरुणांनी केली आहे.
सोलापूर येथे काढण्यात आलेल्या या मोर्चाची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा असून डोक्यावर नवरदेवाची टोपी, कपाळाला मुंडावळ्या आणि हातात कट्यार असे घेऊन अनेक तरुण घोड्यावर बसलेले होते. एका हातात त्यांनी कोण मुलगी देता का मुलगी असा देखील फलक घेतलेला होता. या मोर्चात पंधरापेक्षा अधिक तरुण घोड्यावर तर इतर वीस-पंचवीस तरुण चालत सहभागी झाले होते.
मुलींची संख्या कमी झाल्यामुळे तरुणांना लग्नासाठी तरुणी मिळत नाहीत त्यामुळे अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत गेलेले असून शंभर तरुणामागे दहा ते बारा तरुणांना मुलीच मिळत नाही असे सांगत पाच वर्षात याहीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा अशी मागणी मोर्चा काढणारे ज्योती क्रांती परिषद हिचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर यांनी म्हटले आहे.