महाराष्ट्रातील पोलीस दलावर असलेला दबाव काही लपून राहिलेला नाही. वेगवेगळ्या सणासुदीचे बंदोबस्त आणि राजकीय नेत्यांची बडदास्त ठेवण्यात कुटुंबासाठी देखील पोलिसांना म्हणावा इतका वेळ देण्यात येत नाही त्यातून अतिरिक्त दबावातून आत्महत्या झाल्याची अनेक प्रकरणे याआधी देखील समोर आलेली आहेत. असेच एक प्रकरण मुंबई येथे समोर आलेले असून आपल्या कुटुंबीयांना ‘ टेक केअर ‘ असा मेसेज करून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आत्महत्या केलेली आहे. मुंबईतील चुनाभट्टी येथे हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, प्रकाश थेतले असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून ते कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोकरीला होते. 21 डिसेंबरपासून आजारी असल्या कारणाने त्यांनी रजा घेतली होती आणि गेल्या चार वर्षांपासून त्यांचा पगार देखील बंद झालेला होता. याच दरम्यान त्यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांना दारूचे व्यसनही लागले.
सतत दारू पीत असल्या कारणाने तसेच आजारपण समोर आल्याने त्यांची मानसिक स्थिती देखील खालावली होती. शनिवारी मध्यरात्री चुनाभट्टी येथील राहत्या घरी त्यांनी कुटुंबीयांना ‘ टेक केअर ‘ असा मेसेज पाठवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या पाहता पोलीस दलाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याकारणाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव असतो त्यातून पोलीस बांधव व्यसनांचे शिकार होतात सोबतच कौटुंबिक मानसिक आधार मिळावा यासाठी कुटुंबाला देखील व्यवस्थित वेळ देता येत नाही आणि त्यातून मानसिक स्थिती आणखी खालावत जाते आणि अशी प्रकरणे घडतात असे या आधी देखील अनेक प्रकरणात समोर आलेले आहे.