महाराष्ट्रात सध्या वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यासाठी मोबाईलमध्ये गाडीचा नंबरचा फोटो व चालकाचा फोटो याचा आधार घेत कारवाई केली जाते मात्र ट्रिपल सीट निघालेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवले आणि गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढून त्याच्या पत्त्यावर दंड भरण्याची नोटीस पाठवली असता हा नंबर चक्क एका चार चाकी गाडीचा निघाल्याचे निष्पन्न झाले. बनावट नंबर वापरणारा आणि ट्रिपल सीट जाणारा दुचाकीस्वार मात्र फरार झाला असून चोर सोडून संन्याशाला सुळी या म्हणीप्रमाणे चारचाकीच्या मालकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी आठ जुलै 2020 रोजी ट्रिपल सीट जाणारी एक दुचाकी पकडली होती. दुचाकीस्वाराने आपले नाव संदीप शिंदे असे सांगितले मात्र कारवाईची नोटीस शिंदे याला न जाता अभिजीत रतनराव गीद ( गीता नगर मालेगाव जिल्हा वाशीम ) या चार चाकी गाडी मालकाला गेली. दोनशे रुपयाचे चलन भरा अथवा 11 डिसेंबर रोजी लोक अदालतीमध्ये उपस्थित रहा, असे या चारचाकी वाहनाला विभागाकडून कळविण्यात आले आहे.
वाहतुकीचे नियम न पाळणार्या विरुद्ध दंडात्मक कारवाई योग्य आहेच मात्र कारवाईचे चलन निर्माण होण्याआधी सदर वाहन चालकाची खातरजमा करणे देखील आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात चूक एकाची आणि दंड दुसऱ्याला अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ शकते.