वृद्धापकाळात अनेकदा पती किंवा पत्नी यांचा मृत्यू झाल्यानंतर इतर व्यक्तीला एकाकी आयुष्य जगावे लागते. एकीकडे मुलाचा मुलीचा संसार वेगळा असतो तर त्यांच्या संसारामध्ये क्वचित प्रसंगी वृद्ध व्यक्तींची अवहेलना देखील होते. कसेबसे करून उरलेले आयुष्य काढावे अशा मानसिकतेत अनेक वृद्ध व्यक्ती नैराश्यात देखील जातात आणि वृद्धाश्रमाशिवाय अखेर पर्याय राहत नाही मात्र मनाने तरुण असेल तर अशा व्यक्तींना कुठली अडचण येत नाही असेच एक प्रकरण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेले असून एका वृद्धाश्रमात वयाच्या सतराव्या वर्षी एका व्यक्तीने दुसऱ्या वृद्ध महिलेशी लग्न केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथील ही घटना असून वृद्धाश्रम चालक असलेले बाबासाहेब पुजारी यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांचा विवाह धुमधडाक्यात लावून दिलेला आहे. त्यांच्या या लग्नात जात धर्म कुंडली काहीही पाहण्यात आले नाही. कुठलाही हुंडा नाही मात्र केवळ एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन हे वृद्ध दांपत्य लग्नबेडीत अडकलेले आहे.
अनुसया शिंदे ( वय 70 मूळ राहणार वाघोली जिल्हा पुणे ) असे या नववधूचे नाव असून बाबुराव पाटील ( वय 75 राहणार शिवनाकवाडी तालुका शिरोळ ) असे वृद्ध नवरदेवाचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते वृद्धाश्रमात असून शरीराने स्वावलंबी असले तरी दोघांचेही साथीदार देवाघरी गेलेले आहेत त्यामुळे समदु:खी असलेले या जोडप्याने अखेर विवाह केलेला असून कायदेशीर सल्ला घेऊन वृद्धाश्रमात मांडव घालून ग्रामस्थ आणि प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडत हा विवाह संपन्न झालेला आहे. त्यांच्या या विवाहाची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा असून एकाकी आयुष्य जगण्यापेक्षा त्यांनी निवडलेला मार्ग योग्य असल्याच्या प्रतिक्रिया देखील अनेक जणांनी दिलेल्या आहेत.