महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या लातूर इथे समोर आलेला असून आपण कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आहोत असे दाखवत बनाव निर्माण करणाऱ्या एका तोतया न्यायाधीशाला पोलिसांनी अटक केलेली आहे. लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मीरअली युसुफअली सय्यद ( वय 32 वर्ष राहणार इंडिया नगर लातूर ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने मी कौटुंबिक न्यायालयाचा न्यायाधीश आहे असे म्हणत लातूर येथील एका पोलीस ठाण्यात तो आलेला होता. पोलिसांनी देखील त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला एक पोलीस गाडीसोबत एक अंगरक्षक दिला त्यानंतर तो अहमदपूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी गेला आणि एका राजकीय नेत्यासोबत विकास कामाच्या भूमिपूजनाला देखील उपस्थित राहिला. पोलीस निरीक्षक यांनी देखील काहीही चौकशी केली नाही त्यामुळे त्यांच्या देखील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
नामांकित पुढाऱ्याने केलेल्या या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी न्यायाधीश म्हणून या व्यक्तीचा सत्कार देखील करण्यात आला. त्यावेळी गावातील काही ग्रामस्थ व्यक्तींच्या मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रकरणात काहीतरी काळेबरे असल्याचा संशय आला आणि त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिक चौकशी करण्यात आली त्यावेळी हा बनाव समोर आला आहे . पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले आहे.